कागल तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्याकडेला टाकण्यात आल्याच्या प्रकरणाचा गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला असून, या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनकुमार विरेंद्र भर (रा. नुरनगर रामपूर, जि. सारन, बिहार) याचा खून जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी रंजनकुमार याने आरोपी सनी मुन्ना भर याच्या बहिणीला पळवून नेले होते. त्याच कारणाचा राग आरोपींच्या मनात होता. संबंधित तरुणीला भेटण्यासाठी रंजनकुमार कोल्हापुरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी कट रचल्याचा आरोप आहे.
दि. १५ जून रोजी आरोपी सनी मुन्ना भर, रोहन मुकेश भर आणि अर्जुन मुकेश्वर सिंह यांनी रंजनकुमार याला बोलावून घेतले. त्याला दारू पाजून विविध ठिकाणी मोटारसायकलवर फिरविल्यानंतर कागल येथील इंडियन पेट्रोलपंपासमोरील रेमंड चौक ते लक्ष्मी टेकडी मार्गावरील एका आंब्याच्या झाडाखाली नेण्यात आले. तेथे त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यानंतर रोहन आणि अर्जुन यांनी त्याला पकडून ठेवले असता सनी याने गळा दाबून त्याचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह मोटारसायकलवरून पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेजवळील रस्त्यालगत टाकून पलायन केले. मात्र, गोकुळ शिरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली.
या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५२, २३८ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एका दिवसात खुनाचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने गोकुळ शिरगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
