छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने २२ वर्षीय विवाहित तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिचा मानसिक छळ केला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओळखीचा फायदा घेत अश्लील फोटो तयार केले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी यांची पूर्वी ओळख होती. याच ओळखीच्या काळात आरोपीने संबंधित महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून स्वतःकडे ठेवले होते. दरम्यानच्या काळात पीडित महिलेचं लग्न झाले. लग्न झाल्यानंतरही आरोपी तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला त्रास देत होता.
बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून फोटो व्हायरल
महिलेने तिचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी आरोपीशी संपर्क ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला तिचे जुने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची उघड धमकी दिली. तसेच त्याने इन्स्टाग्रामवर एक बनावट आयडी तयार केला. या बनावट अकाउंटवरून त्याने पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि केले.
मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पोलिसात धाव
आरोपीकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्या आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे पीडित महिला प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. हा त्रास असह्य झाल्याने अखेर तिने वैजापूर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वैजापूर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
